– गुढीपाडवा निमित्त परंपरेला उजाळा; राज्यभरातून मल्लांची हजेरी
बिबी (ऋषी दंदाले) : गुढीपाडवा चैत्रोत्सवानिमित्त बिबी येथे आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक कुस्त्यांच्या दंगलीने यंदाही कुस्तीप्रेमींना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच दिल्लीसारख्या ठिकाणांहून आलेल्या मल्लांनी आपल्या कौशल्याचे दमदार प्रदर्शन करत प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले.
बिबीच्या आखाड्याची ख्याती दूरवर पसरली असून यंदाच्या दंगलीत अंतिम मानाच्या कुस्तीत दिल्ली येथील उदयकुमार आणि अंबड (रोहिला गड) येथील युवराज जाधव यांच्यात रोमांचक लढत झाली. दीर्घकाळ रंगलेल्या या कुस्तीत दोन्ही मल्लांनी जोरदार डावपेच रचले. अखेरीस पंच समितीने सामना अनिर्णित घोषित करत ११ हजार रुपयांचे पारितोषिक दोघांना समसमान देण्यात आले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक वाघ्या-मुरळी, सोंग, गोंधळ आदी कार्यक्रमांनी रात्रीपासूनच उत्सवाची रंगत वाढवली होती. सकाळी नगरप्रदक्षिणेनंतर गढी परिसरात शिवाई देवीची आरती करून धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून नवस फेडले. दुपारी कुस्त्यांना सुरुवात झाली. चंद्रकला हाइट्सच्या प्रांगणात भरलेल्या या दंगलीत सुमारे दीड लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. लहान गटातील १० वर्षांखालील मुलांपासून ते अनुभवी मल्लांपर्यंत सर्वांनी कुस्त्या खेळून प्रेक्षकांची दाद मिळवली.
या उपक्रमामागे युवकांनी व्यसनमुक्त राहून पारंपरिक खेळांकडे वळावे हा संदेश देण्यात आला. विदर्भ, मराठवाडा तसेच जालना, संभाजीनगर, वाशिम, बीड, नांदेड, बुलढाणा आणि दिल्ली येथील कुस्तीपटूंनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

