–शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी
बिबी (ऋषी दंदाले) : १९ मार्च रोजी झालेल्या गारपिटीमुळे लोणार तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली.
वझर आघाव, येवती, पार्डा दराडे, चिंचोली सांगळे, देऊळगाव कुंडपाळ, अजिसपुर, खुरामपूर या गावांमध्ये गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. कांदा, हरभरा, गहू, टरबूज यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावेळी सहदेव लाड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

