–ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी शांतता कमेटीचे संयोजकांना आवाहन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी पंचक्रोशीत विविध सण-उत्सव व जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुका पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजऱ्या होत असतात. मात्र, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पुढील काळात सर्व मिरवणुका व उत्सव डी.जे. मुक्त व्हावेत, अशी महत्त्वपूर्ण चर्चा आळंदी शांतता कमेटीच्या बैठकीत करण्यात आली. या संदर्भात अंतिम निर्णयासाठी लवकरच सर्वसमावेशक संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
आळंदी पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बैठकीला नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, शांतता कमेटी सदस्य, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, उत्तमराव गोगावले, अर्जुन मेदनकर, मंगेश तिताडे, अजित वडगावकर, अॅड. नाझीम शेख, सोहेल शेख, आरीफ शेख, हमीद शेख, इम्रान हकीम, निसार सय्यद तसेच पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत गुढी पाडवा, रमजान ईद, श्री हनुमान जयंती, भगवान महावीर जयंती, श्री रामनवमी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मिरवणुकांचे मार्ग, पोलीस बंदोबस्त तसेच नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके यांनी सांगितले की, आळंदीत अनेक मिरवणुका डी.जे. मुक्त पद्धतीने पार पडत असून हा आदर्श इतर गावांनीही स्वीकारला आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या मिरवणुका आता वेळेच्या मर्यादेत संपविल्या जात आहेत. यासाठी स्थानिक पदाधिकारी, शांतता कमेटी सदस्य आणि पोलीस प्रशासनाचे सहकार्य महत्त्वाचे ठरत आहे.
आगामी काळात आळंदी पंचक्रोशीत ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सर्व मिरवणुका, उत्सव व कार्यक्रम डी.जे. मुक्त करण्यासाठी संयोजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शांतता कमेटीतर्फे करण्यात आले. बैठकीत उपस्थित मान्यवरांनी आपापली मते मांडत सकारात्मक चर्चा केली. कार्यक्रमाचे संयोजन पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांनी केले.

