–अहिल्यानगरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर, कारणांबाबत चर्चा
अहिल्यानगर (बाळासाहेब खेडकर) : धार्मिक क्षेत्राला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यात उघडकीस आली आहे. श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी रविवारी (दि. १५ मार्च २०२६) सायंकाळी आपल्या निवासस्थानी धारदार शस्त्राने स्वतःचे जननेंद्रिय छाटून घेतल्याची घटना घडली. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. मात्र, अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ५.३० वाजता ही घटना घडली. महाराजांनी आपल्या खोलीत स्वतःला कोंडून घेत धारदार शस्त्राने स्वतःवर वार केले. काही वेळाने सेवकांनी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्यांना तातडीने पाथर्डी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. जखम गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले. डॉ. हर्षवर्धन तनवर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने तातडीने शस्त्रक्रिया केली. सुमारे दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर महाराजांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील ७ ते ८ दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप तसेच इतर मान्यवरांनी रुग्णालयात भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, महाराजांनी व्हिडिओ संदेशाद्वारे भाविकांना शांत राहण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात आणि भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून गडावरील सीसीटीव्ही फुटेज व संबंधितांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

