– चार दिवसांपासून बिबट्याचा वावर; वनविभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : जवळील मोहाडी शिवारात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी (१५ मार्च) सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास बिबट्याने एका नीलगायीची (रोही) शिकार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
नीलगाईचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकून शेतात काम करत असलेले शेतकरी गजानन बबन इंगळे व माजी सैनिक पुंजाजी इंगळे आवाजाच्या दिशेने धावले. त्यावेळी एक मादी बिबट्या व तिची दोन पिल्ले नीलगायीवर हल्ला करत असल्याचे त्यांनी पाहिले. बिबट्याने नीलगायीला जबड्यात पकडून ठेवले होते. हे दृश्य पाहून शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली.
चार दिवसांपूर्वीही मोहाडी गावालगतच्या तलाव परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला होता. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी लाठ्या-काठ्या घेऊन पाठलाग करत बिबट्याला हाकलून लावले होते. उन्हाळ्यामुळे परिसरातील पाण्याचे स्रोत आटत चालले असले तरी मोहाडी परिसरात पाझर तलाव तसेच कोराडी धरण असल्याने येथे पिण्याच्या पाण्याची व हिरव्या चाऱ्याची उपलब्धता आहे. त्यामुळे नीलगाई, हरणे, कोल्हे आदी वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून त्यांच्या शिकारीसाठी बिबट्यानेही या भागाकडे मोर्चा वळविला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी आढळलेल्या नीलगायीच्या पाठीवर, पार्श्वभागावर आणि पोटावर नखांनी ओरबडल्याच्या जखमा दिसून आल्या. पोटावर मोठी जखम झाल्याने ती रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत पडलेली होती. मागील चार दिवसांतील मोहाडी परिसरातील ही दुसरी घटना असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीही मौजे शिंदी परिसरात बिबट्याने माकडाची शिकार करून झाडावर टांगले होते तसेच दोन कुत्र्यांचीही शिकार केली होती. त्यामुळे वनविभागाने तातडीने या घटनांची दखल घेऊन मोहाडी परिसरात येऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोहाडी गावाच्या पूर्वेकडील तलाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने रब्बी हंगामात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एखादी जिवितहानी होण्यापूर्वीच वनविभागाने तातडीने बिबट्याचा शोध घेऊन परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शिवदास रिंढे यांनी केली आहे.

