– किनगाव राजा पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई; तिघांना १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : समृद्धी महामार्गालगत बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या व अँगल चोरी प्रकरणाचा किनगाव राजा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ फेब्रुवारी रोजी पहाटे समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक ३१६ ते ३२८ दरम्यान बसविण्यात आलेल्या सुरक्षेसाठीच्या लोखंडी जाळ्या व अँगल अज्ञात चोरट्यांनी उचकटून नेले होते. या घटनेमुळे महामार्ग सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या प्रकरणी समृद्धी महामार्गावरील व्यवस्थापक उदय एकनाथ काकडे (रा. दुसरबीड टोलनाका बिल्डिंग, ता. सिंदखेडराजा) यांच्या फिर्यादीवरून किनगाव राजा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ८१/२०२६ दाखल करण्यात आला. चोरीस गेलेल्या मालामध्ये १५ क्विंटल लोखंडी अँगल व २१ क्विंटल लोखंडी जाळी असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज असल्याची नोंद आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला वेग दिला. गुप्त माहितीच्या आधारे १२ मार्च रोजी मध्यरात्री सापळा रचून विलास भाऊलाल दूंडियार (रा. दुसरबीड), देवानंद शंकर डोईफोडे (रा. केशव शिवणी) व सौरभ उर्फ अभिजीत सर्जेराव देशमुख (रा. दुसरबीड) या तिघांना अटक करण्यात आली.
अटकेनंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सौरभ उर्फ अभिजीत देशमुख हा एका नामांकित राजकीय पक्षाचा तालुका पदाधिकारी असल्याची माहिती पुढे येत असल्याने या प्रकरणाची चर्चा रंगू लागली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल विष्णू मुंढे करीत असून कारवाईत पोलिस कर्मचारी गणेश वारकरी व जीवन जायभाये यांनी सहभाग घेतला.

