-श्रींच्या गाभाऱ्यात आकर्षक पुष्प सजावट; इंद्रायणी घाटावर भाविकांची आरतीसाठी गर्दी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथे भागवत एकादशी (पापमोचनी) निमित्त माऊली मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. सुमारे पन्नास हजारांहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्याचे सांगण्यात आले. एकादशी दिनी भाविकांनी मंदिर व नगरप्रदक्षिणा करत हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरातील गाभाऱ्यात करण्यात आलेली आकर्षक पुष्प सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. श्रींच्या दर्शनापूर्वी अनेक भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नान करून धार्मिक विधी पार पाडले.
भागवत एकादशी निमित्त इंद्रायणी नदी घाटावरही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. आळंदी नगरपरिषद व आळंदी देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट व ग्रामस्थांच्या वतीने इंद्रायणीची आरती उत्साहात करण्यात आली. एकादशीच्या दिवशी सकाळी नगरपरिषदेच्या वतीने इंद्रायणी नदी घाट व परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर रांगोळी काढून परिसर सुशोभित करण्यात आला. इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच नदी प्रदूषण रोखण्यासाठी विविध सूचना देत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदनही देण्यात आले.
या प्रसंगी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, अमर गायकवाड, गोविंद ठाकूर, सोमनाथ बेंडाले, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णाताई काळे, कौशल्या देवरे, शालन कुरधोंडकर, विद्या आढाव, शकुंतला चोपडे, अनिता पोतदार, दमयंती आर्दड, रीनाताई पवार, मेघा काळे आदींसह अनेक महिला भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, एकादशीच्या दिवशी आळंदीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आळंदी-दिघी वाहतूक पोलीस शाखेने विशेष नियोजन केले होते. त्यामुळे मोठ्या गर्दीच्या परिस्थितीतही वाहतूक सुरळीत राहिल्याने नागरिक व व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक केले. मात्र दुचाकी वाहन चालकांवर होत असलेल्या दंडात्मक कारवाईबाबत काही भाविकांनी नाराजी व्यक्त करत प्रथम योग्य पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

