– २० पैकी ६ मतदान भागांमध्ये गोंधळ; नागरिकांमध्ये संभ्रम व चिंता
लोणार (वाजिद खान) : शहरात निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाच्या मतदान भाग याद्यांच्या कामात गंभीर गोंधळ निर्माण झाल्याचे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार एकूण २० मतदान भागांपैकी ६ मतदान भागांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओ (Booth Level Officer) यांची नावे अद्याप ऑनलाइन प्रणालीवर दिसत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित भागातील मतदारांमध्ये संभ्रम व चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पूर्वी नियुक्त असलेल्या काही बीएलओंनी “आम्ही आमची ऑर्डर कॅन्सल केली आहे,” असे सांगितल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्यानंतर नवीन बीएलओंची नियुक्ती अथवा त्यांची ऑनलाइन नोंद अद्ययावत करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे मतदान भाग क्रमांक ३०३, ३०४, ३०५, ३०६, ३०८ आणि ३०९ या भागांमध्ये बीएलओंची ऑनलाइन नोंद नसल्याचे समोर आले आहे. या भागांतील मतदारांना नाव नोंदणी, दुरुस्ती किंवा इतर निवडणूक संबंधित कामांसाठी कोणाशी संपर्क साधायचा याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने परिस्थिती स्पष्ट करून नवीन बीएलओंची नियुक्ती व त्यांची ऑनलाइन नोंद अद्ययावत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आगामी निवडणूक प्रक्रियेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

