-“कित्येक वर्षांपासून फक्त आढावा बैठकाच; ठोस निर्णय कधी?” – स्थानिकांचा प्रशासनाला सवाल
लोणार (वाजिद खान) : लोणार सरोवरातील वाढत्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह लोणार येथे भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सरोवर परिसरातील वाढते पाणी, त्याचा परिसरावर होणारा परिणाम तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांकडून सरोवराच्या सध्याच्या पाण्याच्या पातळीची माहिती घेण्यात आली. वाढत्या पाण्यामुळे परिसरातील काही भागांवर होणारा परिणाम तसेच भाविक व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यावरही चर्चा झाली. प्रशासनाने आतापर्यंत कोणती पावले उचलली आहेत आणि पुढील काळात कोणते निर्णय घेण्यात येणार आहेत, याचाही आढावा घेण्यात आला.
दरम्यान, मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी पत्रकारांशी बोलताना प्रशासनावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. लोणार धारातीर्थ भाविकांसाठी स्नानासाठी खुले होईपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. भाविकांच्या श्रद्धा व परंपरा लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. लोणार सरोवर परिसर हा ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळाली. तसेच परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने योग्य त्या उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला.
मात्र आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यापूर्वीच लोणार नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सरोवर परिसरासह शहरातील प्रमुख ठिकाणी साफसफाई मोहीम राबवण्यात आली. रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि सरोवर परिसर स्वच्छ करण्याचे काम नगर परिषद कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर पूर्ण केले. स्थानिक नागरिक, कमळजा माता भक्त आणि सरोवर निसर्गप्रेमींनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “२००९ पासून लोणार सरोवराबाबत फक्त आढावा बैठका घेतल्या जात आहेत; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत अपेक्षित बदल दिसत नाही,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
लोणार सरोवर आणि कमळजा माता मंदिर हे केवळ धार्मिकच नव्हे तर पर्यटन आणि नैसर्गिक वारशाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे सरोवराचे संवर्धन, परिसराचा विकास आणि भाविकांसाठी मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. “आम्हाला केवळ आश्वासने नकोत; लोणार सरोवराचे संवर्धन आणि कमळजा माता मंदिराचा सन्मान टिकवणारे ठोस निर्णय हवेत,” असा संतप्त सूर कमळजा माता भक्त व सरोवरप्रेमी नागरिकांनी व्यक्त केला आहे. आयुक्तांच्या या दौऱ्यामुळे प्रशासनाचे लक्ष पुन्हा एकदा लोणार सरोवराकडे वळले असले तरी आता प्रत्यक्षात कोणते निर्णय घेतले जातात आणि परिस्थितीत खरोखर बदल होतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

