–२ लाखांचा लोखंडी माल लंपास प्रकरण उघड; तीन आरोपींना अटक, एक आरोपी नामांकित पक्षाचा तालुका प्रमुख असल्याची चर्चा
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : समृद्धी महामार्गालगत बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या व अँगल चोरीच्या प्रकरणाचा किनगाव राजा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मध्यरात्री टाकलेल्या सापळ्यात पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील एक आरोपी हा नामांकित राजकीय पक्षाचा तालुका प्रमुख असल्याची माहिती पुढे येत असल्याने या प्रकरणाची चर्चा तालुकाभर रंगू लागली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्यापूर्वी समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक ३१६ ते ३२८ दरम्यान बसविण्यात आलेल्या सुरक्षेसाठीच्या लोखंडी जाळ्या व अँगल अज्ञात चोरट्यांनी उचकटून नेले होते. या धाडसी चोरीमुळे महामार्गालगतच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकरणातील फिर्यादी उदय एकनाथ काकडे (वय ४२, रा. दुसरबीड टोलनाका बिल्डिंग, ता. सिंदखेडराजा) हे समृद्धी महामार्गावर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ते पेट्रोलिंग करत असताना संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. २ मार्च २०२६ रोजी रात्री १०.१६ वाजता किनगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा क्रमांक ८१/२०२६ दाखल करण्यात आला.
चोरीस गेलेल्या मालामध्ये सुमारे १५ क्विंटल लोखंडी अँगल (अंदाजे किंमत ७५ हजार रुपये) आणि २१ क्विंटल लोखंडी जाळी (अंदाजे किंमत १ लाख २५ हजार रुपये) असा एकूण सुमारे २ लाख रुपयांचा लोखंडी माल असल्याची नोंद करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होताच किनगाव राजा येथील ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत दि. १२ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री संशयितांवर धाड टाकली आणि तीन आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विलास भाऊलाल दूंडियार (वय ३६, रा. दुसरबीड ता. सिंदखेडराजा), देवानंद शंकर डोईफोडे (वय २८, रा. केशव शिवणी ता. सिंदखेडराजा) आणि सौरभ उर्फ अभिजीत सर्जेराव देशमुख (वय ३२, रा. दुसरबीड ता. सिंदखेडराजा) यांचा समावेश आहे. या तिघांनी समृद्धी महामार्गालगत बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या व अँगल चोरून नेल्याचा आरोप असून पोलिसांनी त्यांना दि. १२ मार्च रोजी रात्री ११.२२ वाजता अटक केली. अटकेनंतर आरोपींना किनगाव राजा पोलीस ठाण्यात आणून हवालात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सौरभ उर्फ अभिजीत देशमुख हा एका नामांकित राजकीय पक्षाचा तालुका प्रमुख असल्याची चर्चा पुढे येत असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदर गुन्हा पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष शेळके (ब. नं. ९९०) यांनी दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू मुंढे (ब. नं. १२४५) करत आहेत. ही कारवाई ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गणेश वारकरी व पोलीस कॉन्स्टेबल जीवन जायभाये यांनी केली. अटकेनंतर आरोपींच्या नातेवाईकांना कायद्यानुसार माहिती देण्यात आली असून सध्या तिन्ही आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. समृद्धी महामार्गालगत घडणाऱ्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

