–नदीपात्रातील गाळ काढून शेतीसाठी वापर; पाणी साठवण व विहिरींची पातळी वाढण्याची अपेक्षा
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील भोगावती नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तो गाळ काढून आपल्या शेतात टाकण्यासाठी शेतकरी पुढे सरसावले आहेत. लोकसहभागातून नदीचे खोलीकरण करण्याचे काम सध्या सुरू असून अनेक शेतकरी यामध्ये सहभागी होत आहेत.
साखरखेर्डा परिसरातून भोगावती नदी वाहते. या नदीवर तत्कालीन आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत शिंदी, साखरखेर्डा व सवडद भागातून वाहणाऱ्या नदीपात्रात सहा ठिकाणी केटी वेअर उभारले होते. त्यामुळे वर्षातील किमान आठ महिने नदीपात्रात पाणी साठून राहत आहे. मात्र मार्च महिन्यात नदीचे पात्र कोरडे पडल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचून नदीपात्र भरून गेले आहे.
नदीपात्रातील गाळ शेतीसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. रासायनिक खतांच्या तुलनेत हा गाळ पिकांसाठी अधिक पोषक असल्याने नदीकाठावरील अनेक शेतकरी एकत्र येऊन नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम हाती घेत आहेत. लोकसहभागातून हे काम सुरू असल्याने शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. उलट शासनाने या उपक्रमाला सहकार्य करावे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. शिंदी परिसरातही नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी शेतकरी संघटित होत असून सरपंच अशोक खरात यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. नदीपात्रातील गाळ काढल्यास बंधाऱ्यांमध्ये पाण्याची आवक वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. सध्या मार्च महिन्यात अनेक विहिरी कोरड्या पडल्या असल्याने पुढील वर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी नदीचे खोलीकरण महत्त्वाचे ठरत आहे.
साखरखेर्डा येथील काही शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला असला तरी इतर शेतकऱ्यांनीही पुढे येऊन लोकसहभागातून सुरू असलेल्या या कामात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी लोकसहभागातून नदीचे खोलीकरण सुरू केले असून ही अत्यंत फायद्याची बाब आहे. शेतकऱ्यांना खोलीकरण व गाळ काढण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रदेश भाजप सदस्य उल्हास देशपांडे यांनी सांगितले.

