मढीची ऐतिहासिक यात्रा : जोशी समाजाला काला प्रसादाचा पूर्ववत मान द्यावा – वामनराव मापारे

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-भटका जोशी समाजाचा राज्यव्यापी मेळावा उत्साहात; परंपरागत मान पुन्हा सुरू करण्याची मागणी

बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : मढी यात्रा ही भटक्या समाजाची पंढरी म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी येथे भटका जोशी समाजाला काला प्रसाद (मलिदा) देण्याचा पारंपरिक मान होता. हा मान पुन्हा पूर्ववत मिळावा यासाठी देवस्थान विश्वस्त मंडळाशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भटका जोशी समाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष वामनराव मापारे यांनी दिली.

भटका जोशी समाजाचा राज्यव्यापी मेळावा यावर्षी सालाबादप्रमाणे मढी येथे शनिवारी उत्साहात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्वी दारोदार फिरून भविष्य कथन करणे हा या समाजाचा पारंपरिक व्यवसाय होता; मात्र काळानुरूप बदल होत शिक्षण व विविध व्यवसायात समाजाचा सहभाग वाढत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

समाजाचे प्रदेशाध्यक्ष नारायण गदई, समाधान गुराळकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जोशी, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब महापुरे, अॅड. मुकुंद यदमळ आदींनी काल्याच्या मानपानाबाबत सविस्तर चर्चा करत माहिती दिली. होळीच्या दिवशी सायंकाळी गोपाळ समाजाची मानाची होळी पेटल्यानंतर जोशी समाज मढीत दाखल होत असे. त्यानंतर गूळ, पोळी व शुद्ध तूप कालवून तयार केलेला मलिदा म्हणजेच काल्याचा प्रसाद सर्व ग्रामस्थांना वाटला जात असे. मढीतील मानपानामुळे अनेक ठिकाणी जोशी समाजाला “मरकड जोशी” म्हणून ओळखले जाते. मढीचे मरकड बांधव परंपरेने नाथभक्त म्हणून प्रसिद्ध असून त्यांनी भटक्या समाजाला आपल्या कुटुंबियांचा दर्जा देत यात्रेत मानपान देऊन पाहुणचार केला. भटके समाज व मढीच्या मरकड बांधवांचे कुलदैवत कानिफनाथ असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी बोलताना वामनराव मापारे म्हणाले की, पुढील महिन्यात शिर्डी येथे राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येणार असून त्यानंतर पुढील वर्षाच्या कार्यक्रमांची धोरणात्मक रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन वसंतराव नाईक भटक्या विमुक्त महामंडळावर जोशी समाजाचा प्रतिनिधी देण्याची मागणी केली जाणार आहे. दरम्यान, कैकाडी व गोपाळ समाजाप्रमाणे जोशी समाजालाही काल्याचा मान पुन्हा सुरू करावा, अशी मागणी अॅड. मुकुंद यदमळ यांनी केली. समाजातील मतभेद विसरून रूढी-परंपरा जपण्यासाठी संघटित होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात रमाकांत साळवे, मुकुंद यदमळ, उद्धव काळे व विनोद दुर्वे यांना ‘समाज भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी रवींद्र गंगावणे, रमेश यज्ञेकर, समाधान गुरहाळकर, पवन झुंगे, रामचंद्र गंगावणे, दादा गजरे, भाऊसाहेब गदई, अंबादास गोडे, शिवाजी पोटे, पिंटू वागडकर, राजेंद्र वागडकर आदींनी चर्चेत सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब महापुरे यांनी केले, सूत्रसंचालन नारायण गदई यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र जोशी यांनी मानले.

Share This Article
Exit mobile version