-नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष ‘समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. १४ मार्च २०२६ रोजी चांधई मंडळातील मारोती मंदिर सभागृह, चांधई तसेच उदयनगर मंडळातील किसनदेव महाराज संस्थान, उदयनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरांतर्गत शेतकरी व नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये फेरफार अदालत घेऊन प्रलंबित नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार मंजूर करणे, पंतप्रधान आवास योजना तसेच इतर राज्यस्तरीय घरकुल योजनेंतर्गत मंजूर घरकुलांना प्रती घरकुल ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देणे व त्याबाबत अर्ज मंजुरी देणे, पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे लँड सीडिंग करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणे तसेच उर्वरित शेतकऱ्यांची यादी अपलोड करणे यांचा समावेश आहे.
तसेच डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ फेरफार वाटप करणे, ‘अॅग्रीस्टॅक’ अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार करणे, नवीन आधार नोंदणी व आधीच्या आधारची अद्ययावत नोंद करणे, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व, वय, अधिवास प्रमाणपत्र, शेतकरी दाखला, भूमिहीन दाखला तसेच ऐपत प्रमाणपत्र आदी विविध दाखले प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय मतदान कार्ड वाटप व आधार-मतदान कार्ड जोडणी, विशेष सहाय्य योजना लाभ, संजय गांधी निराधार योजनेबाबत आधार व्हॅलिडेशन, मोजणी शिट ‘क’ प्रत वाटप, पुरवठा विभागामार्फत नवीन रेशन कार्ड, रेशन कार्ड दुरुस्ती, नाव कमी करणे तसेच डिजिटल रेशन कार्ड प्रदान करणे व रेशन कार्डसाठी ई-केवायसी करण्यात येणार आहे. गावातील अकुशल व्यक्तींना जॉबकार्ड देणे, ‘आभा’ कार्ड प्रदान करणे, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देणे, आरोग्य तपासणी व लसीकरण, तसेच महा-डीबीटी पोर्टलअंतर्गत फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, कोल्ड स्टोरेज, सेडनेट, पॉलीहाउस, सिंचन साधने, शेततळे आदी योजनांचा लाभही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामविकास विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ, जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे आदी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दरम्यान, शेतजमीन अकृषिक (NA) करण्यासाठी लागणारी स्वतंत्र ‘सनद’ किंवा जिल्हाधिकाऱ्यांची विशेष परवानगी घेण्याची अट रद्द करण्यात आली असून जमिनीचा अकृषिक वापर करण्यासाठी आता केवळ एकदाच रूपांतरण अधिमूल्य भरावे लागणार आहे. तसेच वार्षिक एनए करही रद्द करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ जाहीर करण्यात आली असून या योजनेअंतर्गत शेतातील रस्ते पक्के (बारमाही) करण्यात येणार आहेत. तसेच १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता ‘मानीव नियमित’ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना या शिबिरामध्ये देण्यात येणार असून चिखली तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिखली तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे.

