-सर्दी, अंगदुखीच्या गोळ्यांसाठीही रुग्णांना खाजगी दवाखान्याचा आधार; पदे रिक्त, इमारतीची दुरावस्था
-तातडीने उपाययोजना करण्याबाबत आमदार सिद्धार्थ खरात यांचे निर्देश
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक औषधसाठा उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सर्दी व अंगदुखीच्या साध्या गोळ्याही उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्याचा रस्ता धरावा लागत आहे. तसेच येथे अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून आरोग्य केंद्राच्या इमारतीचीही दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन औषधसाठा उपलब्ध करून देत इतर अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी येथील माजी उपसरपंच रणजीत देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले.
संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत देऊळगाव साखरशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलक औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, जीर्ण इमारतीची दुरुस्ती करावी, सफाई कर्मचारी नियुक्त करावा, संरक्षण भिंत उभारावी तसेच इतर समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी माजी उपसरपंच रणजीत देशमुख यांनी केली आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले.
दरम्यान, देऊळगाव साखरशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व फार्मासिस्ट यांच्याशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी तात्काळ संपर्क साधून औषधसाठ्याबाबत विचारपूस केल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या स्टॉक रूममध्ये औषधसाठा उपलब्ध असून सध्या तो क्वारंटाईन अवस्थेत आहे. संबंधित औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यापूर्वी त्यांची तपासणी करणे आवश्यक असते. त्यासाठी औषधांचे नमुने तपासणीसाठी (NABL) दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच संबंधित आरोग्य केंद्रांना औषधांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

