फ्रिजच्या स्फोटामुळे घराला भीषण आग!!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-लग्नासाठी आणलेल्या साहित्यांसह लाखोंचा ऐवज जळून खाक

बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव तालुक्यातील दिवटे येथील रामनगर परिसरात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे फ्रिजचा स्फोट होऊन घराला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तूंसह लग्नासाठी खरेदी करून ठेवलेले किराणा साहित्य, कपडे तसेच सुमारे दीड लाख रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली. त्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर येथील ऊसतोडणी कामगार दत्तू रतन सांगळे यांच्या राहत्या घरात गुरुवारी रात्री अचानक विजेच्या शॉर्टसर्किटमुळे फ्रिजमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर काही क्षणांतच घरात आग लागून ती झपाट्याने पसरली. घरात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले.

या आगीत घरात साठवून ठेवलेले लग्नासाठीचे किराणा साहित्य, नवीन कपडे, रोख रक्कम तसेच फर्निचर, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. सांगळे कुटुंबीयांनी लग्नासाठी केलेली सर्व तयारी या आगीत भस्मसात झाल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या मदतीने काही वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राला देण्यात आल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे रामनगर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटना घडल्यानंतर वीज वितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच वीजपुरवठा खंडित करण्यासाठी सुमारे अर्ध्या तासाचा कालावधी लागल्याने वीज वितरणाच्या गलथान कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Share This Article
Exit mobile version