–केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त
लोणार (वाजिद खान) : दि. १२ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या सूचनेनुसार लोणार येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी लोणार शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्रुजी फुके यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या वेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, लोणार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, माजी शहराध्यक्ष नितीन शिंदे, नगरपालिका उपाध्यक्ष आबेद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजता लोणार तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किमती वाढवून जनतेवर अन्याय केला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्या तरी त्याचा बोजा सर्वसामान्यांवर पडू दिला नाही. त्या काळात घरगुती गॅस सिलिंडर सुमारे ४०० रुपयांना मिळत होता, तर आता एका सिलिंडरसाठी ९०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत आहे. तसेच सिलिंडर बुक करण्याचा कालावधी १५ दिवसांवरून एक महिन्यापर्यंत वाढवण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती सुमारे १९०० रुपयांपर्यंत गेल्या असून त्याचे रेशनिंगही करण्यात येत आहे. याचा मोठा फटका विद्यार्थी, कामगार, नोकरदार तसेच हॉटेल, खानावळ आणि लहान व्यावसायिकांना बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सरकार गॅसची टंचाई नसल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिक तसेच हॉटेल, खानावळी व खाद्यपदार्थ विक्रेते यांना गॅस सिलिंडर सहज उपलब्ध व्हावा यासाठी योग्य व्यवस्था करावी आणि गॅसच्या वाढवलेल्या किमती तात्काळ कमी कराव्यात, अशी मागणी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. “घरगुती गॅसची दरवाढ थांबवा, नाहीतर गादी सोडा”, “सामान्य माणूस त्रस्त, गॅसच्या दरांनी जनतेची कंबर मोडली”, “महागाईला आळा घाला, गॅस सिलिंडर स्वस्त करा” अशा घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात नगरसेवक पंढरी चाटे, नगरसेवक संतोष मापारी, आरोग्य सभापती अब्दुल उबेद हाजी अब्दुल मुनाफ, नगरसेवक अरुण जावळे, नियोजन सभापती साहेबराव पवार, नगरसेवक जमील कुरेशी, तालुका उपाध्यक्ष श्याम राऊत, नगरसेवक गुलाब सरदार, नगरसेवक रमजान परसुवाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दौलत मानकर, ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, प्रा. विठ्ठल भानुसे, शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शंकर हेंद्रे, युवा काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, शेख अफसर शेख तुराब, भवानी मापारी, शिवा मापारी, गणी पटेल, शुभम चाटे, दीपक मानवतकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

