जालना जिल्हा रुग्णालयात जागतिक किडनी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

 -डायलिसिस विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार; किडनी विकारांपासून बचावासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा सल्ला

सिंदखेडराजा/जालना (सुरेश हुसे) : जालना जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस विभागात जागतिक किडनी दिनानिमित्त दि. १२ मार्च रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. रविंद्र बेदरकर उपस्थित होते.

कार्यक्रमाला डायलिसिस विभागप्रमुख डॉ. प्रशांत बांदल, किडनी विकार तज्ज्ञ डॉ. शालिक जाधव, परिचारिका श्रीमती जोशी, डायलिसिस तंत्रज्ञ राजकिरण वाघमारे, राहुल शेलार, विवेक बाणायत तसेच अधिपरिचारिका प्रीती व छाया उपस्थित होत्या. प्रास्ताविकात डॉ. प्रशांत बांदल यांनी किडनी विकारांची कारणे, सुरुवातीची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती दिली. मधुमेह, उच्च रक्तदाब, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि अपुरी पाण्याचे सेवन यामुळे किडनी विकारांचा धोका वाढतो, असे त्यांनी सांगितले. किडनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी पिणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी किडनी विकारांविषयी समाजात व्यापक जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी डायलिसिस विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या रुग्णसेवेतील योगदानाचे कौतुक करण्यात आले. नागरिकांनी आरोग्याबाबत सजग राहून किडनी विकारांपासून बचावासाठी योग्य जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञ यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना किडनी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे किडनी विकारांविषयी जनजागृती निर्माण होण्यास मदत झाली.

Share This Article
Exit mobile version