-एक आरोपी ताब्यात; आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल
देऊळगाव राजा (सुरेश हुसे) : जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने आक्रमक पवित्रा घेत देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई केली. या कारवाईत विनापरवाना धारदार तलवार बाळगणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेत तलवार व कारसह एकूण १ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड तसेच अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तर देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. ९ मार्च २०२६ रोजी ही कारवाई केली.
कारवाईदरम्यान संशयित व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना लोखंडी धारदार तलवार आढळून आली. तसेच आरोपीकडून पांढऱ्या रंगाची जुनी कारही जप्त करण्यात आली. पोलिसांनी तलवार (किंमत अंदाजे १ हजार रुपये) व कार (किंमत अंदाजे १ लाख रुपये) असा एकूण १ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या प्रकरणी कलम ४/२५ आर्म्स अॅक्ट तसेच १३५ बीपी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करत आहेत. ही कारवाई पीएसआय पंकज सपकाळे, एएसआय राजेंद्र अंभोरे, एएसआय ओमप्रकाश सावळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेजोळ, दीपक वायाळ व मनोज खर्डे यांच्या पथकाने केली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

