– तहसीलदार आणि पोलिसांचे दुर्लक्ष – अमोल साळवे यांचा आरोप
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्रातून रेतीची वाहतूक सुरू झाली असून ज्या घाटांची हर्रासी झालेली नाही त्या भागातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असल्याचा आरोप अमोल साळवे यांनी केला आहे. ही रेती उत्खनन करून विनानंबर हायवा वाहनांमधून वाहतूक केली जात असल्याने दुसरबीड ते साखरखेर्डा या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याची दखल तहसीलदार आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काल तहसीलदार अजित दिवटे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खडकपूर्णा नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास वाळू उपसा सुरू आहे. काही ठराविक ठिकाणी रेती घाटांची हर्रासी झाली आहे, परंतु त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी रेती उत्खनन करून विनापरवाना रेती उपसा केला जात आहे. तसेच ही रेती विनापरवाना हायवा टिप्परमधून वाहतूक करून विविध गावांमध्ये पोहोचविली जात आहे. हे टिप्पर इतक्या वेगाने धावत असतात की समोरून येणाऱ्या मोटारसायकलस्वारांना कट मारून अपघातास कारणीभूत ठरतात आणि भरधाव वेगाने निघून जातात. आजपर्यंत दुसरबीड ते साखरखेर्डा या रस्त्यावर शेकडो अपघात झाले असून ते बहुतांश रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बंद घाटांतून छुप्या पद्धतीने रेतीचा उपसा सुरू असून रात्रीच्या वेळी दोन पोकलेन मशिनच्या सहाय्याने घाटातून अंदाजे ४० फूट खोलीपर्यंत अवैध उत्खनन केले जात आहे, जे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे.
दिवसा कोणतेही महसूल अधिकारी किंवा तलाठी देखरेखीसाठी उपलब्ध नसल्यामुळे रेती वाहतूक करणारे टिप्पर चालक याचा फायदा घेत एकाच पावतीवर दिवसभर अनेक फेऱ्या मारून रेतीची अवैध वाहतूक करीत आहेत. महसूल विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे दररोज हजारो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असून यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून महाखनी ॲपद्वारे मॉनिटरिंग होत नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच रेती वाहतूक करणाऱ्या कोणत्याही वाहनांवर ‘जीपीएस’ प्रणाली बसवलेली नाही. रेती उत्खनन सुरू असलेल्या घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्यामुळे शासन कारवाई करण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वाळू घाटांचे नियम धाब्यावर बसवून रात्रंदिवस सुरू असलेला अवैध रेती उपसा तातडीने थांबवावा आणि संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अमोल साळवे यांनी तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे केली आहे.

