–सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा कल्पना विजय साबळे यांचे मार्गदर्शन; महिलांना इतिहासातील महान स्त्रियांच्या कार्याची प्रेरणा
लोणार(वाजिद खान) : लोणार तालुक्यातील खापरखेड येथे ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संभाजीनगर येथील सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा सौ. कल्पना विजय साबळे यांनी आपल्या माहेरी येऊन हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. रंजना राजेंद्र सदावर्ते उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या स्वागताने करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात सौ. कल्पना विजय साबळे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करत महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाच्या बळावर समाजात आपले स्थान अधिक बळकट करावे, असे आवाहन केले. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. रंजना राजेंद्र सदावर्ते यांनी मार्गदर्शन करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ आणि रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या विचारांमधून महिलांनी प्रेरणा घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवावा, असे त्यांनी सांगितले.
सौ. कल्पना विजय साबळे यांनी आपल्या माहेरी खापरखेड येथे प्रथमच जागतिक महिला दिन साजरा केल्याने उपस्थित महिलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ग्रामीण भागातील महिलांना एकत्र आणून त्यांना मार्गदर्शन करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रेखा पांडुरंग सदावर्ते यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून सर्व महिलांना सकारात्मक व स्वाभिमानी जीवन जगण्याची प्रेरणा दिली.

