-कान्होबादेव उर्फ कानिफनाथदेव यात्रेत भक्तिमय वातावरण
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : तालुक्यातील मढी येथे कान्होबादेव उर्फ कानिफनाथदेव यात्रा उत्सवानिमित्त आज रंगपंचमीच्या दिवशी मनाच्या काठ्या वाजवत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कान्होबादेवांचे दर्शन घेतले.
रंगपंचमीच्या निमित्ताने मढी परिसरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, जयघोषात आणि गुलाल उधळत मनाच्या काठ्यांची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. यात्रेमुळे मढी परिसरातील सर्व रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चोहोबाजूंनी भाविकांची गर्दी उसळल्याने परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था व पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.