-खडकपूर्णा डाव्या कालव्याच्या पाण्यासाठी आत्महत्या; आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी
बिबी (ऋषी दंदाले) : देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा डाव्या कालव्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबाला राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ व परिसरातील गावांना खडकपूर्णा डाव्या कालव्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी राज्य सरकार पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी कैलास नागरे यांनी मागील दोन ते तीन वर्षांपासून विविध प्रकारची आंदोलने व उपोषणे केली होती. शासन व प्रशासनाकडून लेखी आश्वासने देऊन त्यांचे आंदोलन अनेक वेळा मागे घेण्यात आले. मात्र मागील वर्षी शासन व प्रशासनाकडून मागण्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने कैलास नागरे यांनी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी शासन व प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे नमूद करणारे पत्रही लिहिले होते. या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली होती. त्यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राज्य सरकारकडून कैलास नागरे यांच्या कुटुंबाला विविध आश्वासने देण्यात आली होती.
मात्र आजपर्यंत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. दुसरीकडे ज्या मुख्य मागणीसाठी युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली त्या खडकपूर्णा डाव्या कालव्याच्या पाण्याचा प्रश्न देखील अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे राज्य सरकारने व लोकप्रतिनिधींनी कैलास नागरे यांच्या कुटुंबाला तसेच परिसरातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द तात्काळ पूर्ण करावा, अशी मागणी सहदेव लाड यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.