-प्रेमप्रकरणाची शक्यता; जिल्ह्यात खळबळ, पोलिसांकडून तपास वेगाने सुरू
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या मेहकर तालुक्यात पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली असून एमआयडीसी परिसरात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. राहुल बाजड असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राहुल बाजड हे मूळचे बेलगाव येथील रहिवासी होते. ते वाशीम जिल्ह्यातील केनवड येथे ‘आपलं कलेक्शन’ नावाचे कापड दुकान चालवत होते. गेल्या काही वर्षांपासून ते जाम आढाव येथे आपल्या मामाकडे वास्तव्यास होते. दरम्यान ३ मार्चच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी त्यांना गाठून मेहकर-खंडाळा परिसरातील एमआयडीसी भागात नेले. तेथे दगडाने ठेचून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर दगडाने वार करून चेहरा विद्रूप केल्याची माहिती समोर आली आहे.
४ मार्च रोजी सकाळी एमआयडीसी परिसरात रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला. दरम्यान या हत्येमागे नेमके कारण काय याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी प्राथमिक स्तरावर ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. राहुल बाजड यांचा काटा काढण्यासाठीच हा कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारची घटना घडल्यामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून आरोपी कितीही हुशार असला तरी तो कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, लवकरच या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

