बौद्ध धम्म हा जीवनाचा मार्ग – पुज्य भदंत प्रज्ञापालजी महाथेरो

breakingmah Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-साखरखेर्डा येथे एकदिवसीय धम्म परिषद उत्साहात संपन्न

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : बौद्ध धम्म हा जीवनाचा मार्ग असून सदाचरण हे जीवनाचे कवच आहे. त्याचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मौलिक प्रतिपादन पुज्य भदंत प्रज्ञापालजी महाथेरो यांनी केले. ते साखरखेर्डा येथे आयोजित एकदिवसीय धम्म परिषदेत संबोधित करत होते.

साखरखेर्डा येथील समस्त धम्म बांधवांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुज्य भदंत अतिसा यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अनिकेत सैनिक स्कूलमध्ये या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी पलसिद्ध कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष साहेबराव काटे महाराज होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभाताई गवई यांच्या हस्ते पंचशील धम्मध्वजाच्या अनावरणाने झाली. त्यानंतर धम्मवंदना घेऊन अध्यक्षांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उद्घाटन पुज्य भदंत अतिसा यांच्या हस्ते झाले.

या परिषदेला पुज्य भदंत प्रज्ञापालजी महाथेरो (वाशीम), पुज्य भदंत अभय बोधी महाथेरो (वर्धा), पुज्य भदंत महेंद्र बोधी महाथेरो (इसोली), पुज्य भदंत पटीसेन (हिंगोली) आणि पुज्य भदंत शिवाली (मालेगाव) उपस्थित होते. धम्मदेशनादरम्यान प्रज्ञापालजी महाथेरो यांनी बौद्ध धम्माचे आचरण जीवनात कसे अंगीकारावे याबाबत मार्गदर्शन केले. सर्व भिक्खू संघांनी आपल्या प्रवचनातून धम्माचे महत्त्व आणि आचरणाची गरज अधोरेखित केली. यावेळी कैलास सुखदाने, दिलीप खंडारे, ठाणेदार गजानन करेवाड आणि उपप्राचार्य रविंद्र झनके यांनीही मनोगते व्यक्त केली. परिसरातील धम्म बांधवांच्या सहकार्याने अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमास माजी सरपंच कमळाकर गवई, अंबादास गवई, मानिकराव बनसोडे, दादाराव सरकटे, दादाराव गवई, शालिकराम गवई, भाई विशाल गवई यांच्यासह अनेक मान्यवर आणि धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिषदेचे सूत्रसंचालन अर्जुन गवई यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साखरखेर्डा येथील नवयुवकांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी ‘सरनार्थ गाथा’ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share This Article
Exit mobile version