शेतकऱ्यांच्या घामावर डल्ला मारणाऱ्या लुटारूंची आता खैर नाही; अकोट कापूस घोटाळ्याची ‘एसआयटी’ चौकशी!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्या तक्रारीची सरकारकडून गंभीर दखल; ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश!

मुंबई/अकोला (बाळू वानखेडे) – बळीराजाच्या कष्टावर डल्ला मारणाऱ्या आणि कापूस खरेदीत माया जमवणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत. अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सीसीआय कापूस खरेदीत झालेल्या महाघोटाळ्याची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘विशेष तपास पथक’ (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक आणि गजानन पुंडकर यांनी पुराव्यासह केलेल्या तक्रारींनंतर अखेर सरकारने हा दणका दिला आहे. विशेष म्हणजे, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेदेखील या प्रश्नी जोरदार आवाज उठवला होता.

अकोट बाजार समितीत कापूस आणि ज्वारी खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले होते. या लुटीचा मुद्दा मागील हिवाळी अधिवेशनात आमदार अमोल मिटकरी यांनी लावून धरला होता. शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यात परस्पर फेरफार करून व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे करण्याचा ‘काळा बाजार’ येथे सुरू होता. यावर पणनमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आता शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या एसआयटीचे अध्यक्ष असतील, तर अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अमरावतीचे लेखापाल यात सदस्य म्हणून काम पाहतील. या पथकाला पुढील ९० दिवसांत आपला अंतिम अहवाल सादर करायचा आहे. जर चौकशीत फसवणूक सिद्ध झाली, तर संबंधित अधिकारी आणि संस्थांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. नरसिंग महाराज प्रोड्यूसर कंपनी आणि खरेदी-विक्री संघाने ज्वारी खरेदीत सातबारा उताऱ्यांशी जी छेडछाड केली, त्याचे ‘ऑपरेशन’ आता एसआयटी करणार आहे.


बुलढाण्यातही व्यापाऱ्यांची मग्रूरी!

अकोटप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातही सीसीआय खरेदीत मोठा डल्ला मारण्यात आल्याचा आरोप क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी केला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने स्वतःचा माल खपवून सातबारावरील क्षेत्रफळ बदलल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. येथील केंद्रांचीही जिल्हा उपनिबंधकांमार्फत चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या एकाही दोषीला सोडले जाणार नाही, असा इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे. आता एसआयटीच्या तपासात कोणाकोणाचे ‘काळे चेहरे’ समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जीआर वाचण्यासाठी येथे क्लीक करा..

Share This Article
Exit mobile version