अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-महाराष्ट्र साहित्य परिषद, इस्लामपूर शाखेकडून २०२५ चा सन्मान; ८ मार्च रोजी ईश्वरपूर येथे होणार पुरस्कार वितरण

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय २०२५ पुरस्कारांची घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेत करण्यात आली. राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, शाखाध्यक्ष दिपक स्वामी आणि प्रा. धर्मवीर पाटील यांनी ही घोषणा केली.

प्रख्यात मराठी कवी व नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांच्या अथर्व पब्लिकेशन, जळगाव तर्फे प्रकाशित झालेल्या ‘वळीवाच्या वेळा’ या बहुचर्चित कवितासंग्रहाला हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रेरणादायी स्मृती जपण्यासाठी गेली ३० वर्षे ८ मार्च रोजी भव्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. ईश्वरपूर येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनात प्रसिद्ध लेखिका व कवयित्री प्रज्ञा पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. अजीम नवाज राही हे लेखणी आणि वाणी या दोन्ही क्षेत्रांत ठसा उमटवणारे महत्त्वाचे नाव मानले जाते. ‘व्यवहाराचा काळा घोडा’, ‘कल्लोळातला एकांत’, ‘वर्तमानाचा वतनदार’, ‘तळमळीचा तळ’ आणि ‘वळीवाच्या वेळा’ हे त्यांच्या कवितासंग्रहांचे उल्लेखनीय टप्पे ठरले आहेत. प्रयोगशीलतेचा ध्यास, स्वतंत्र नाममुद्रा आणि वर्तमानाशी असलेली घट्ट नाळ यामुळे त्यांनी मराठी कवितेत वेगळे स्थान निर्माण केले आहे.

राही यांच्या कवितेत सर्वसामान्य माणसाचे दुःख, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि उपेक्षित घटकांचे वास्तव प्रभावीपणे व्यक्त होते. धर्म, जात, पंथ यांच्या चौकटींपलीकडे जाऊन मानवी मूल्यांची जपणूक करणारी त्यांची कविता वास्तववादी, सकस आणि भाषिकदृष्ट्या समृद्ध आहे. मातीचा सुवास, घनगंभीर वस्तुनिष्ठता, प्रतिमाशृंखलांचे वैशिष्ट्यपूर्ण लावण्य आणि खास मृदगंधी शब्दकळा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये मानली जातात. मुस्लिम संस्कृतीसह सर्वधर्मीय जीवनरितींचा बहुपदरी अनुभव त्यांच्या कवितेतून उमटतो. मानव्याचा संदेश देणारी आणि वर्तमानाला कवेत घेणारी ही कविता मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारी ठरली आहे.

Share This Article
Exit mobile version