-चंदनपूर पाझर तलाव परिसरात वाढता वावर; वनविभागाने तातडीने कारवाई करावी, मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : शिंदी येथील चंदनपूर शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सेवानिवृत्त शिक्षक तेजराव किसन खरात यांच्या शेतातील एका झाडावर वानर मृतावस्थेत आढळून आले. ही शिकार बिबट्याने केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वीही परिसरात काही मोकाट कुत्री मृतावस्थेत आढळली होती. त्या घटनांमागेही बिबट्याचा हात असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. दोन दिवसांपूर्वी चंदनपूर पाझर तलाव परिसरात बिबट्याने एका जनावराची शिकार करून झाडावर नेल्याचे दृश्य पुरुषोत्तम खरात यांनी पाहिले. त्यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिल्यानंतर संबंधित छायाचित्रे वनविभागाला पाठविण्यात आली. वनअधिकाऱ्यांनी ठसे बिबट्याचे असल्याचे सांगितले; मात्र अद्याप घटनास्थळी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिलेली नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
गेल्या महिनाभरापासून या पाझर तलाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले जाते. या भागात अनेक शेतकरी बागायती शेती करतात. मका, भुईमूग, कांदा यांसारख्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी रात्री शेतात जागरण करतात. त्यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती देऊनही वनविभागाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी व आवश्यक बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

