– प्रशासनाच्या नाकाखाली मृत्यूचे कारखाने की कत्तलखाने? वर्षभरात दुसरा मोठा स्फोट; कामगारांच्या जिवाशी खेळणाऱ्यांना फासावर लटकवा!; नागरिकांचा संताप
नागपूर (विशेष प्रतिनिधी) – उपराजधानी नागपूरच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव परिसरात आज रविवारी सकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास काळाने घाला घातला. ‘एसबीएल एनर्जी’ या स्फोटक बनविणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 17 निष्पाप कामगारांचा जागीच कोळसा झाला, तर 18 हून अधिक जण मृत्यूशी झुंज देत आहेत. हा स्फोट इतका भयानक होता की, त्याचे पडसाद कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आले. रक्ताचे सडे, छिन्नविछिन्न झालेले मृतदेह आणि आक्रोश पाहून पाषाणहृदयी माणसाच्याही डोळ्यात पाणी येईल, असे भीषण दृश्य घटनास्थळी पाहायला मिळत आहे.
—-
मदतीचा ओघ आणि संतापाचा लाव्हा
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी धाव घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप असून, “आमचे हक्काचे माणसं गेले, आता चौकशीचं काय चाटायचं?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

