आदतन तुमने कर दिए वादे,
आदतन हमने एतिबार किया…
भारतातील सत्तारुढ भाजपा सरकारने २०१६ मध्ये ‘नोटबंदी’ जाहीर केली. आता ५०० व १००० च्या नोटा ‘कागज का टुकडा’ समजा असे सांगत अर्थशास्त्रींचा विरोध असतांना दोन हजाराच्या नोटा चलनात आणल्या. बाजारातील बोगस नोटांचा नायनाट होणार, काळ्या पैश्यांवर निर्बंध लागणार, दहशतवाद्यांकडे असलेला पैसा संपावा, आदी उद्देशाने नोटबंदी जाहीर केली होती. तसेच नकली नोटा छापताच येणार नाही, अशा नोटा आणल्याचे सांगण्यात आले होते. काही हौशी व ‘गोदी’ मीडियाने तर दोन हजाराच्या नविन नोटांमध्ये ‘चीप’ असून नोटा कुठे व केव्हापासून ठेवण्यात आल्या ते कळेल, असे टीव्ही चॅनलवरुन जाहीरही केले होते.
प्रत्यक्षात चलनात छोट्या नोटा असाव्यात, भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होते, छोट्या नोटा साचवून ठेवण्यास अडचणीचे होते. असे अर्थशास्त्रींचे विचार असताना भाजपा सरकारने दोन हजाराची नोट बाजारात आणली आणि शेवटी व्हायचे तेच झाले, दोन हजाराच्या बोगस नोटांचा सुळसुळाट झाला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार नोटबंदी जाहीर केली त्याच २०१६ मध्ये दोन हजाराच्या २ हजार २७२ बोगस नोटा जप्त करण्यात आल्या. तर २०१७ मध्ये ७४ हजार ८९८ तसेच २०१८ मध्ये ५४ हजार ७७६, सन २०१९ मध्ये ९० हजार ५५६, सन २०२० मध्ये २ लाख ४४ हजार ८३४ बोगस नोटा जप्त करण्यात आल्या. यानंतरची आकडेवारी जाहीर झाली नाही. मात्र सन २०२१-२२ मध्ये बँकिंग यंत्रणेत २ हजाराच्या १३ हजार ६०४ बोगस नोटा आढळल्या आहेत.
देशात बोगस नोटांचे प्रमाण वाढले असा अहवाल मे २०२२ मध्ये रिझर्व्ह बँकेने दिला आहे. यामध्ये ५०० रुपयांच्या बोगस नोटांचे प्रमाण १०१.९ टक्क्यांनी तर दोन हजाराच्या नोटांचे प्रमाण ५४.१६ टक्क्यांनी वाढल्याचे नमूद केले आहे. सन २०१९ मध्ये २ हजाराच्या नोटांची एकूण संख्या ३२ हजार ९१० होती तर २०२१ मध्ये २४ हजार ५१० होती, असे आरबीआय म्हणते. ३० लाख कोटी रुपयांच्या एकूण चलनात २ हजाराच्या नोटांचे मूल्य २०१९ मध्ये ६ लाख ५८ हजार कोटी होते तर २०२० मध्ये ते ४ लाख ९० हजार कोटीवर गेले. ३१ मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार २ हजार आणि ५०० च्या ५८ टक्के नोटा चलनात होत्या तर १०, २०, ५०, १०० रुपयाच्या १५ टक्के नोटा चलनात होत्या. प्रत्यक्ष छोट्या व्यवहारात २ हजाराच्या नोटांमुळे अडचणी येतात म्हणून २ हजाराच्या तुलनेत ५०० आणि १०० रुपयाच्या नोटांचे चलन वाढल्याचे स्पष्ट झाले. तर २ हजाराच्या नोटा व्यवहारातून गायब होत आहेत.
दुसरीकडे एका घटनेने बोगस नोटांच्या सुळसुळाटाकडे सर्वांचे पुन्हा लक्ष वेधले. २ हजाराची बोगस नोट चलनात आणल्या प्रकरणी भाजपाच्या माजी आमदाराच्या पत्नीला तुरुंगवासाची शिक्षा झाली. झारखंडमधील चाईबास येथील भाजपाचे माजी आमदार पुत्कर हँब्रम यांची पत्नी मलाया हँब्रम हिला झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील न्यायालयाने चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा न्यायाधिश सूर्यभूषण ओझा यांनी सुनावली व ५ हजाराचा दंडही केला. ही शिक्षा ऑगस्ट २०२२ च्या दुस-या आठवड्यात सुनावण्यात आली.
मागे सप्टेंबर २०२० मध्ये मुफ्फासिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रारकर्ती जयंती देवगम मटकाम्हटू हिने म्हटले होते की, तिच्याकडून १६०० रुपयाचे सामान खरेदी करतांना मलायाने २ हजाराची नोट दिली, तर ती नोट बोगस सांगून स्टेट बँकेने घेण्यास नकार दिला.
एकूणच बोगस नोटांमुळे देशाच तसेच नागरिकांचे वैयक्तिक नुकसान होते. बँकेत बोगस नोटांवर चलनात वापरता येणार नाही असे शिक्के मारुन नोटा परत मिळतात किंवा बँक जप्त करुन घेते. वास्तविक ग्राहकांनी ही नोट घरी छापलेली नसते. वास्तविक सरकार, राजकारणी व नागरिक यापैकी बोगस नोटा रोखावयाच्या आहेत तरी कोणाला? हा प्रश्न निर्माण होतो.
शेवटी व्यवस्थेवर विश्वास ठेवणेही धोक्याचे ठरते हेच सिध्द होते, या आशयाचा शेर आठवतो…
ऑखे बंद कर जो दुसरो पर भरोसा कर लेते है,
एक दिन उनकी आँखे जरुर खुल जाती है!
(लेखक हे विदर्भातील आघाडीचे दैनिक देशाेन्नतीचे आवृत्ती संपादक असून, विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार आहेत. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे ते संपादकीय मार्गदर्शक आहेत. ‘सरळ-सरळ’ हा त्यांचा दैनिक देशाेन्नतीमध्ये दरमंगळवारी प्रसिद्ध हाेणारा लाेकप्रिय स्तंभ आहे.)

