अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेत साखरखेर्डाच्या आम्रपाली गवईने पाली विषयात सुवर्णपदक पटकावले

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-४२ व्या दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मान; परिसरात आनंदाचे वातावरण

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा येथील कै. भास्करराव शिंगणे कला, नारायण गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयातील कु. आम्रपाली राजू गवई हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत वाङ्मय स्नातक उन्हाळी २०२५ परीक्षेत पाली विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करून सुवर्णपदक पटकावले आहे. दिनांक २३ फेब्रुवारी रोजी अमरावती येथे पार पडलेल्या ४२ व्या दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या हस्ते तिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

आम्रपाली ही साखरखेर्डा येथील विद्यार्थिनी असून तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. पाली भाषा ही अतिशय प्राचीन भारतीय भाषा असून ती प्रामुख्याने थेरवाद बौद्ध धर्माच्या धार्मिक व साहित्यिक परंपरेशी संबंधित आहे. इंडो-आर्यन भाषा समूहातील ही भाषा मध्ययुगीन भारतीय आर्य भाषा मानली जाते. भगवान बुद्धांनी आपले उपदेश जनसामान्यांच्या भाषेत दिले; ती भाषा पुढे ‘पाली’ म्हणून ओळखली जाऊ लागली. बौद्ध धर्मातील ‘त्रिपिटक’ या पवित्र ग्रंथाची मूळ भाषा पाली आहे.

संस्कृतपेक्षा सोपी रचना असलेली पाली ही प्राकृत भाषांचा एक प्रकार मानली जाते. अहिंसा, दया आणि समता या तत्त्वांवर आधारित समृद्ध साहित्य या भाषेत उपलब्ध आहे. पाली भाषेचा उगम भारतात झाला असून कालांतराने ती श्रीलंका, म्यानमार, थायलंड, कंबोडिया आणि लाओस आदी दक्षिण-पूर्व आशियाई देशांत प्रसारित झाली. आज जगातील अनेक विद्यापीठांत पाली भाषेचा अभ्यास केला जातो. भारतातही या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे ‘आम्रपाली’ या नावातही ‘पाली’ हा शब्द येतो आणि तिने सुवर्णपदक मिळवलेला विषयही पालीच असल्याने हा सुंदर योगायोग मानला जात आहे. आम्रपाली गवई हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले आहे. ती गजानन गवई यांची पुतणी आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल साखरखेर्डा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share This Article
Exit mobile version