लोणार सरोवरातील कमळजा माता मंदिर वाचवण्यासाठी सामूहिक उपोषण सुरू

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-वाढत्या पाणीपातळीमुळे मूर्ती धोक्यात; तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन

लोणार (वाजिद खान) : लोणार सरोवरातील वाढत्या पाणीपातळीमुळे कमळजा माता मंदिर धोक्यात आले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी आज २३ फेब्रुवारी २०२६ पासून भाविकांनी तहसील कार्यालय, लोणार समोर बेमुदत सामूहिक उपोषण सुरू केले आहे.

लोणार सरोवरात मागील सहा महिन्यांपासून सातत्याने पाणीपातळी वाढत असल्याने सरोवराच्या काठावरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कमळजा देवीच्या मूर्तीच्या डोळ्यांपर्यंत पाणी पोहोचले आहे. काही दिवसांत मूर्ती पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. भाविकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊन तसेच आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. Bombay High Court यांच्या नागपूर खंडपीठानेही या प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करून घेतली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून सरोवरात जाणारे गोडे पाणी लिफ्टिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र एक महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना सुरू न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. वन्यजीव विभाग, महसूल विभाग, नगरपालिका व इतर यंत्रणा परवानग्यांचे कारण देत असल्याची नाराजी भाविकांनी व्यक्त केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित लोणार सरोवर विकास समितीची बैठक अमरावती येथे झाली असली तरी प्रत्यक्ष कामाला गती मिळालेली नाही. दरम्यान, वाढत्या पाणीपातळीमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याने शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सदर उपोषणाकडे आता प्रशासन कोणती भूमिका घेते व वाढती पाणीपातळी रोखण्यासाठी प्रत्यक्ष उपाययोजना कधी सुरू होतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Exit mobile version