साखरखेर्डा येथील माजी सैनिक लक्ष्मणराव ठोकरे यांचे निधन

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

अंत्यसंस्कारास मान्यवरांची उपस्थिती; अनेकांनी अर्पण केली श्रद्धांजली

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील माजी सैनिक लक्ष्मणराव किसनराव ठोकरे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते.

आज सायंकाळी रोकडोबा हनुमान मंदिरामागील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मणराव ठोकरे यांचे मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील भर जहागीर हे होते. ते साखरखेर्डा येथील बाबुराव घोडके यांचे जावई होते. विवाहानंतर त्यांनी १९६५ साली भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवा सुरू केली. पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात त्यांनी सहभाग घेतला होता. देशसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची त्यांची प्रतिज्ञा होती. २० वर्षे सैन्यसेवा बजावल्यानंतर त्यांनी आपल्या शाम व नाना या दोन्ही मुलांनाही सैन्यात पाठवून देशसेवेची परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांच्या कुटुंबातील शिशुपाल घोडके व प्रकाश घोडके हेही भारतीय सैन्य दलात कार्यरत होते.

अंत्यसंस्कारावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. लक्ष्मणराव ठोकरे यांची महादेवावर नितांत श्रद्धा होती. सेवानिवृत्तीनंतर ते दरवर्षी पंचमढी येथे महाशिवरात्रीला जात असत. यंदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते जाऊ शकले नाहीत; मात्र मुलांना पाठवून त्यांनी परंपरा खंडित होऊ दिली नाही. रमजान महिन्यात रोजा धरणारे ते एकमेव भक्त होते. ‘ईश्वर एकच आहे’ हा त्यांचा संदेश होता. राष्ट्रीय एकात्मता व बंधुता जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.

यावेळी अनेक माजी सैनिक, माजी सरपंच कमलाकर गवई, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक इंगळे, प्राथमिक शिक्षक संघाचे नेते तथा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुधाकर परहाड, सुनील रिंढे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम २६ तारखेला ठेवण्यात आला आहे.

Share This Article
Exit mobile version