सिंदखेडराजा येथे वंजारी समाजाचा ओबीसी एल्गार मेळावा; आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-चिखला काकड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हजारोंची उपस्थिती; निष्पक्ष चौकशीची मागणी

दुसरबीड (भगवान नागरे) : दि. २३ फेब्रुवारी रोजी बीबी येथे वंजारी समाजाच्या वतीने ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, चिखला काकड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले.

चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादातून वंजारी समाजावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत या मेळाव्यात हजारो महिला-पुरुष सहभागी झाले होते. २५ तारखेला पुन्हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास तोडीस तोड उत्तर दिले जाईल, असा इशाराही काही वक्त्यांनी दिला. विनोद वाघ यांनी जिजाऊंच्या भूमीला बदनाम करण्यासाठी खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध झाला असता तर आम्ही स्वतः उभे राहिलो असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. एकतर्फी गुन्हे दाखल केल्याबाबत प्रश्न उपस्थित करत खऱ्या दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. जमावबंदी असताना बाहेरून येणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित करत संख्येच्या बळावर कोणी सभा घेतल्यास त्यापेक्षा मोठी सभा घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.

डॉ. सुनील कायंदे यांनी संबंधित व्हिडिओबाबत शंका उपस्थित करत त्याची सत्यता पडताळण्याची गरज असल्याचे नमूद केले. चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवून गाव व समाज बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. धनराज गुट्टे यांनी काही बाहेरील नेत्यांवर टीका करत विदर्भातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले. सविता मुंडे यांनीही गावाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. माजी खासदार सुखदेव काळे, प्रदीप नागरे यांच्यासह इतरांनीही समयोचित भाषणे केली.

मेळाव्यात काही वक्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत विदर्भात जातीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्या नावांचा उल्लेख करत स्थानिक राजकारण विदर्भात आणू नये, असे मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान, चिखला काकड येथे पुतळा हटवण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे; मात्र वंजारी समाजाने हे आरोप फेटाळले. काही वक्त्यांनी संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज तपासावे व सत्य सार्वजनिक करावे, अशी मागणी केली.

मेळाव्यास माजी आमदार तोताराम कायंदे, माजी खासदार सुखदेव काळे, सतीश कायंदे, प्रभाकर ताठे, प्रा. सुभाष दराडे, भगवानराव सानप, प्रकाश गिते, आत्माराम कायंदे, दीपक बुधवंत, दीपक घुगे, डॉ. सुनील केंद्रे, दीपक कायंदे यांच्यासह वंजारी समाजातील शेकडो पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सिद्धेश्वर आंधळे यांनी केले. मेळाव्यातील वक्त्यांनी प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, आवश्यक असल्यास आधुनिक तपास पद्धतींचा वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Share This Article
Exit mobile version