चिखला काकड : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण

breakingmah Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-नेत्याच्या भूमिकेविरोधात शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सिंदखेडराजा (भगवान नागरे) : चिखला काकड (ता. लोणार) येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ. जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला असून या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

चिखला काकड येथील पुतळा प्रकरणामुळे राज्यभरात चर्चा सुरू असताना शिवसेना (शिंदे गट) चे नेते व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या भूमिकेबाबत अस्वस्थता व्यक्त करत सौ. कायंदे यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. संबंधित प्रकरणाची सखोल शहानिशा न करता एकतर्फी भूमिका घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला आहे.

राजीनामा पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीनुसार सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करणे ही पक्षाची भूमिका राहिली आहे. मात्र सद्यस्थितीत जातीयतेचा आभास निर्माण होईल अशी भूमिका घेतली जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. विशेषतः वंजारी समाजाला लक्ष्य केल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे.

आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाबद्दल तिरस्काराची भूमिका घेतली जात असल्याचा उल्लेख करत अशा नेतृत्वाखाली काम करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सामाजिक भावना लक्षात घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्राच्या शेवटी नमूद करण्यात आले असून राजीनामा तात्काळ मंजूर करून आपल्याला या परिस्थितीतून मुक्त करावे, अशी विनंती त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मागील काळात विविध प्रलोभने धुडकावून लावत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या सौ. जयश्री दीपक कायंदे यांच्या या निर्णयामुळे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

Share This Article
Exit mobile version