-‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा; ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाचा देशव्यापी शुभारंभ
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे): सेवा हीच साधना आणि निसर्गसंवर्धन हीच जबाबदारी या भावनेतून संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचा भव्य शुभारंभ रविवारी (ता. २२) सकाळी ८ ते ११ या वेळेत संपूर्ण भारतभर एकाच वेळी करण्यात येणार आहे. हा उपक्रम परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
या देशव्यापी मोहिमेचे व्यापक स्वरूप अभियानाला ऐतिहासिक बनवत असून, जलसंधारण आणि स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील टप्प्यांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रेरित होऊन चौथा टप्पा अधिक संघटित, व्यापक आणि दूरदृष्टीपूर्ण पद्धतीने राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मधुर समूहगायन, जनजागृती चर्चासत्रे आणि सोशल मीडिया मोहिमेद्वारे जलजन्य आजारांविषयी जागरूकता तसेच स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. पाणी हे केवळ साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे. त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे, ही भावना समाजात रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
संत निरंकारी मिशनने बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणीचा स्वीकार करून सन २०२३ मध्ये भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली होती. जलसंवर्धन हा केवळ एकदिवसीय कार्यक्रम नसून तो जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारला जावा, अशी प्रेरणा या उपक्रमातून दिली जाते. नद्या, तलाव, सरोवरे, विहिरी व झरे अशा नैसर्गिक जलस्रोतांची स्वच्छता आणि संवर्धन करून ‘स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज’ घडविण्याचा संकल्प या अभियानामागे आहे. “जेव्हा मन निर्मळ असते तेव्हाच निसर्ग स्वच्छ राहतो आणि जेव्हा सेवेत समर्पण असते तेव्हा समाजाचे नवनिर्माण होते,” हा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
या अनुषंगाने चिखली येथील वायझडी तलाव परिसरात चिखली शाखा व परिसरातील साधसंगत यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ८ ते ११ या वेळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा जिल्हा संयोजक शालिकराम चवरे गुरुजी यांनी दिली.‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान निसर्ग, समाज आणि आत्म्याशी नाते दृढ करत करुणा, समतोल आणि सौहार्दपूर्ण भविष्य घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

