-आ. सौ. श्वेता महाले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; ‘सरपंच होणार आता प्रशासक’
बुलढाणा(महेंद्र हिवाळे): ग्रामपंचायतींच्या कामकाजात सातत्य राहावे आणि विकासकामांना खंड पडू नये, या भूमिकेतून आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे. राज्य शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेत अधिकृत राजपत्राद्वारे परिपत्रक प्रसिद्ध केले असून, त्यानुसार विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून पदभार देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत राज्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने प्रशासनिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. अशा वेळी बाहेरील विस्तार अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमल्यास स्थानिक विकासकामांवर आणि दैनंदिन कारभारावर परिणाम होऊ शकतो, असे आमदार महाले पाटील यांनी आपल्या निवेदनात नमूद केले होते.
त्यांनी स्पष्ट केले होते की, विद्यमान सरपंच व सदस्य गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या कामकाजाशी पूर्णतः परिचित आहेत. स्थानिक प्रश्न, सुरू असलेली विकासकामे आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी ते अधिक प्रभावीपणे करू शकतात. विस्तार अधिकाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने सर्व ग्रामपंचायतींवर प्रभावी नियंत्रण ठेवणे कठीण ठरू शकते. त्यामुळे लोकहिताच्या दृष्टीने विद्यमान सरपंच व सदस्यांनाच प्रशासक म्हणून पदभार द्यावा, अशी त्यांची ठाम मागणी होती. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत शासनाने संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात येणार असून, ही नेमणूक जास्तीत जास्त सहा महिन्यांसाठी किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राहणार आहे.
या निर्णयामुळे ग्रामपंचायतींच्या विकासकामांना गती मिळेल, तसेच गावपातळीवरील प्रशासनात स्थैर्य आणि सातत्य राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. “गावांचा विकास आणि सक्षम प्रशासन हीच आमची प्राथमिकता आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनाच जबाबदारी दिल्यास कामे अधिक वेगाने आणि परिणामकारकरीत्या पूर्ण होतील,” अशी भूमिका आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या भूमिकेला शासनाने मान्यता दिल्याने चिखली विधानसभा मतदारसंघासह राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून आमदार श्वेता महाले पाटील यांचे कौतुक होत आहे.

