-निवडणूक होईपर्यंत विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्य पाहणार कारभार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यासह राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, त्या ग्रामपंचायतींचा कारभार आता विद्यमान सरपंचांकडेच राहणार असल्याचे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत. संबंधित आदेश सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्राप्त झाले असून, विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना पुढील निवडणूक होईपर्यंत प्रशासक म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
यानुसार पुढील सहा महिने किंवा ग्रामपंचायत निवडणूक होईपर्यंत विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्यांना प्रशासकीय अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.सिंदखेडराजा तालुक्यातील एकूण ४३ ग्रामपंचायतींवर यापूर्वी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शासनाच्या नव्या आदेशानंतर हे अधिकार पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधींना देण्यात आले आहेत. शासन सहसचिव वर्षा भरोसे यांनी या आदेशास मान्यता दिली आहे.mया निर्णयामुळे साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगावराजा आदी मोठ्या ग्रामपंचायतींमधील सरपंचांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे.दरम्यान, साखरखेर्डा येथील सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांना सरपंच म्हणून केवळ दहा महिने पूर्ण झाले होते. शासनाच्या निर्णयामुळे त्यांना उर्वरित कालावधीत काम करण्याची संधी मिळाली आहे. गावातील रस्ते, नाली आदी प्रलंबित विकासकामे वेगाने पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

