-मुस्लिम युवक अजीस शेख यांच्या सहभागातून सामाजिक ऐक्याचा संदेश
चिखली (गोपाल वाळेकर) : सोनेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त यंदाही उत्साह, भक्तिभाव आणि पारंपरिक पद्धतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जगदंबा प्रतिष्ठान, सोनेवाडी यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या सोहळ्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गाव शिवमय झाले.
मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरला तो फुलांची सजावट, भगवे ध्वज आणि पारंपरिक अलंकारांनी सजविलेला ट्रॅक्टररूपी रथ. या भव्य रथाचे चालक मुस्लिम समाजातील युवक अजीस शेख होते. त्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि कौशल्याने रथ चालवत मिरवणुकीला वेगळेच वैशिष्ट्य प्राप्त करून दिले. त्यांच्या सहभागातून धार्मिक सौहार्द, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश स्पष्टपणे उमटला. “शिवजयंती हा सर्व समाजांना जोडणारा उत्सव आहे,” हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. कार्यक्रमादरम्यान रायपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी विनोद उबरहंडे व गणेश पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्सव शांततेत पार पडला. सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्कृतीची जपणूक, शिवकार्याची प्रेरणा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ही शिवजयंती सोनेवाडीकरांसाठी संस्मरणीय ठरली.

