तृतीयपंथीयांना जिल्ह्यात पहिल्यांदाच ओळखपत्रांचे वितरण

breakingmah Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान

देऊळगाव राजा (अशोक इंगळे) : शहरातील तृतीयपंथीय समाजासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरलेला कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. जिल्ह्यात पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना अधिकृत ओळखपत्रांचे वितरण देऊळगाव राजा शहराचे ठाणेदार पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे तृतीयपंथीय समाजाला कायदेशीर व सामाजिक ओळख मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

कार्यक्रमात तृतीयपंथी गुरु गादीच्या गुरू रूपाताई टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिष्य उपस्थित होते. तसेच नगरसेवक संदीप शिंदे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात शिवपूजनाने झाली. पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करण्यात आले. तृतीयपंथीयांनी शिवजयंती उत्सव साजरा करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.

तृतीयपंथीयांना अनेकदा भिक्षा मागताना मारहाण, खोटे आरोप तसेच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. अधिकृत ओळख नसल्याने विविध प्रशासकीय व सामाजिक अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर “सनातन भगवा रक्षक” संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष रूपा गुरु टाकसाळ यांनी सर्व शिष्यांना ओळखपत्र देण्याची संकल्पना राबवली. या उपक्रमामुळे तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने वावरण्यासाठी आधार मिळणार आहे. मनोगतात पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी सांगितले की, “तृतीयपंथीयांनी शिवजयंती साजरी करून आपल्या शिष्यांना ओळखपत्राद्वारे जनसामान्यात ओळख निर्माण करून दिली, हा उपक्रम अभिनंदनीय आहे. पोलीस प्रशासन त्यांच्या सुरक्षेसाठी व समस्यांच्या निराकरणासाठी कटिबद्ध आहे.”

अध्यक्ष रूपा गुरु टाकसाळ यांनी सांगितले की, “या ओळखपत्रामुळे माझ्या शिष्यांना समाजात स्वतंत्र ओळख निर्माण होईल. भिक्षा मागताना त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.” तसेच पुढील काळात गोशाळा व संस्कार केंद्र सुरू करण्याचा मानस व्यक्त करत प्रशासनाच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तृतीयपंथीय समाजाने यापूर्वीही नवरात्र उत्सव, गणपती उत्सव तसेच विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम राबवून आपले योगदान सिद्ध केले आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान मिळावे यासाठी त्यांचा संघर्ष आणि चिकाटी उल्लेखनीय आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार सुषमा राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभारही त्यांनी मानले. तृतीयपंथीयांच्या सन्मान, ओळख आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

Share This Article
Exit mobile version