-डीजेवर बंदी, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष; रमजान काळात सलोखा राखण्याचे आवाहन
सिंदखेड राजा (सुरेश हुसे) : शिवजयंती उत्सव शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस स्टेशन किनगाव राजा येथे मंगळवारी (दि. १८ फेब्रुवारी) शांतता समिती व उत्सव मंडळांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत पार पडलेल्या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी मार्गदर्शन केले.
कोणत्याही ठिकाणी अनधिकृत पुतळे उभारले जाणार नाहीत, यासाठी सर्व मंडळांनी दक्षता घ्यावी तसेच सर्व मिरवणुका ठरलेल्या वेळेत व शांततेत पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले. आगामी रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी सर्व समाजघटकांनी संयम, सलोखा आणि परस्पर सन्मान राखावा, असे मार्गदर्शन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. या बैठकीस सुमारे ५० ते ६० नागरिक उपस्थित होते. प्रशासन व नागरिकांच्या सहकार्यामुळे शिवजयंती उत्सव आदर्श व शांततापूर्ण वातावरणात साजरा होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला.

