-प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली
वर्धा(प्रकाश कथले) : नागपूर–सेवाग्राम रेल्वे मार्गावर तुळजापूर दहेगाव स्टेशन नजीक हेलोडी मार्गावर आज सकाळी सुमारे ११.४५ वाजताच्या दरम्यान नवी दिल्ली–चेन्नई (जी.टी.) एक्सप्रेसच्या मागील पार्सल बोगीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. लगतच्या महिला व दिव्यांग बोगीतील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे ही बाब वेळीच लक्षात आली आणि तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र पार्सल बोगीतील सर्व साहित्य जळून खाक झाले.
दरम्यान, दहेगाव (गोसावी) पोलीस स्टेशनचे पीएसआय यशवंत कदम आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सिंदी व सेलू पोलीसही मदतीसाठी पोहोचले. पोलिसांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले. आगीची माहिती मिळताच सिंदी, सेलू व हिंगणघाट येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सिंदी येथील अग्निशमन दलाने सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुमारे तासाभरात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे नागपूर–सेवाग्राम मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. दुपारी सुमारे १.३० वाजताच्या दरम्यान विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून, घटनेची माहिती मिळताच नागपूर लोहमार्ग पोलीस व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनीही तातडीने भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

