लोणार सरोवर संवर्धन व शहर विकासासाठी सर्वसमावेशक आराखड्याची घोषणा

breakingmah Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-आमदार सिद्धार्थ खरात यांची उच्चस्तरीय बैठक

लोणार (वाजिद खान) : मेहकर–लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार परिसरातील वाढती पाणी समस्या, पर्यावरणीय अडचणी आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी आज, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी लोणार सरोवर परिसरातील नव्याने उभारलेल्या माहिती केंद्रात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. ही बैठक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माहिती केंद्रात पार पडली.

बैठकीला वन विभाग, नगर परिषद, पर्यटन विभाग, पुरातत्त्व विभाग तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन विविध कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिले. नगर परिषदेकडून सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच लोणार शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी एप्रिल महिन्यापासून आठ दिवसाआड पाणी वितरण व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मूलभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

वन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून लोणार विकास आराखड्याची माहिती घेतल्यानंतर पर्यटक व स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. जुन्या रेस्ट हाऊसजवळील सनसेट पॉईंट विनामूल्य खुला करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या निर्णयामुळे पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. लोणार हे प्राचीन काळापासून हिंदू, जैन, बौद्ध आणि मुस्लिम धर्मीयांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याचे अधोरेखित करत सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. विविध धर्मीय परंपरांशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन उपक्रम आणि संशोधनपर प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव यावेळी पुढे आला.

लोणार शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र व व्यापक आराखडा स्वतः तयार करण्याचा निर्णय आमदार सिद्धार्थ खरात यांनी जाहीर केला. या आराखड्यात शहरातील मुख्य रस्ते व प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण, उद्याने विकसित करणे, पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करणे आणि शहराला पर्यटन नकाशावर ठळक स्थान मिळवून देणे यांचा समावेश असेल. लोणारचा पर्यटन विकास आदर्श ठरेल अशा पद्धतीने नियोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र बुधवत, तालुका समन्वयक तेजराव घायाळ, नगराध्यक्षपती भूषण मापारी, माजी नगराध्यक्ष शांतीलाल गुगलीया यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version