-कैलास महाराज निर्मळ यांचे प्रबोधन
साखरखेर्डा (वार्ताहर) : प्रापंचिक जीवनात भूक लागल्यावर जशी शिदोरीची गरज असते, तशीच आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यासाठी हरिनामाची शिदोरी आवश्यक आहे. तेव्हाच प्रापंचिक आणि पारमार्थिक जीवन सुखी होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण हितोपदेश ह.भ.प. कैलास महाराज निर्मळ यांनी उपस्थित भाविकांना केला. ते मौजे पेनटाकळी येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनातून प्रबोधन करीत होते.
पेनटाकळी येथे महाशिवरात्रीनिमित्त ८ फेब्रुवारीपासून संगीत महाशिवरात्री शिवपुराण कथेला प्रारंभ झाला होता. ८ ते १५ फेब्रुवारीदरम्यान चाललेल्या या सप्ताहात दररोज सकाळी काकडा आरती, दुपारी संगीत महाशिवरात्री शिवपुराण कथा, सायंकाळी हरिनाम आणि रात्री कीर्तन अशा भावभक्तीपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज १६ फेब्रुवारी रोजी गोपालकाला व महाप्रसाद वितरणाने करण्यात आली. या सोहळ्यासाठी ह.भ.प. गणेश बापू इंगळे, सरपंच पुंजाजी इंगळे, संतोष डुकरे, गजानन खरात, दत्ता राजेकर, संतोष परिहार, पुरुषोत्तम माळेकर, श्रीराम लहाने, संदीप इंगळे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमासाठी सेवा देणाऱ्या कीर्तनकार, प्रवचनकार व भजनी मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

