पांग्रीकाटेतील ‘नशेची शेती’ उद्ध्वस्त!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– दीड कोटींची अफू जप्त; दोन शेतकरी अटकेत, पोलिसांची धडक कारवाई
– डीवायएसपी संतोष खाडे यांच्या पथकाने उपटले गुन्हेगारीचे ‘खसखस’!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – अन्नदात्याच्या नावाखाली शेतात नशेचे पीक फुलवण्याचा धक्कादायक प्रकार पांग्रीकाटे येथे उघडकीस आला आहे. कापूस-सोयाबीनच्या आड अफूची बेकायदा लागवड करणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी धडक कारवाई करत तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांचा अफूचा साठा जप्त केला. भागवत सदाशिव काटे आणि विशाल रमेश काटे या दोघांना अटक करण्यात आली असून, परिसरात या कारवाईने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पांग्रीकाटे येथील गट क्रमांक १४८ आणि १२८ मधील शेतात संशयास्पद लागवड सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने छापा टाकला. पोलिसांचे पथक शेतात दाखल होताच भागवत काटे हा अफूच्या पिकाला पाणी घालताना आढळून आला. शेतात उभ्या असलेल्या पिकाची पाहणी केली असता ते अफूचे असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पंचनामा करून संपूर्ण पिकाचा उपसा करण्यात आला. दोन्ही शेतांमधून एकूण १६४ किलो ९८० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. त्यापैकी भागवत काटे यांच्या शेतातून १०७ किलो ६६० ग्रॅम अफू जप्त झाली असून, तिची बाजारभावानुसार किंमत ८६ लाख १२ हजार ८०० रुपये इतकी आहे. विशाल काटे यांच्या शेतातून ५७ किलो ३२० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली असून, तिची किंमत ४५ लाख ८५ हजार ६०० रुपये इतकी आहे. एकूण जप्त साठ्याची किंमत १ कोटी ३३ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. कारवाईत महसूल विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता. ठाणेदार गजानन करेवाड, नायब तहसीलदार संदीप बंगाळे, आनंद शिंदे (राज्य उत्पादन शुल्क) तसेच पोलीस कर्मचारी डिगांबर चव्हाण, सुनील देशमुख, उमेश घुगे आदी पथकात सहभागी होते.

पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध NDPS Act अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बेकायदा लागवडीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच जप्त मालाचा पुरवठा कोणत्या साखळीमार्फत होत होता, याचा तपास साखरखेर्डा पोलीस करीत आहेत. अन्नदात्याच्या शेतात नशेचा काळा व्यापार फोफावू पाहत असतानाच पोलिसांनी वेळेत कारवाई करून हा प्रकार उधळून लावल्याने प्रशासनाच्या दक्षतेचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Share This Article
Exit mobile version