-मलकापूर पांग्रा येथे बैठक; ग्रामीण पत्रकार संघटन बळकटीवर भर
मलकापूर पांग्रा (जिल्हा प्रतिनिधि) : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने आणि प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक एस.ई.एस. हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बुलढाणा दक्षिण (घाटावरील) कार्यकारिणी बैठकीस पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष प्रतापराव मोरे तसेच पश्चिम विदर्भ संघटक प्रल्हाद देशमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक इंगळे यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांनी संघटित होऊन काम करण्याची गरज अधोरेखित केली. ग्रामीण भागातील समस्या मांडताना पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधत काम करावे लागते. सामान्य नागरिक आपल्या समस्या समजून घेण्यासाठी पत्रकारांकडे आशेने पाहत असतात. त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे हे पत्रकारांचे कर्तव्य असून त्यासाठी संघटन मजबूत असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष प्रतापराव मोरे यांनी ग्रामीण पत्रकार हा शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा असल्याचे नमूद केले. संघटन कौशल्यामुळे कामाची मांडणी प्रभावीपणे करता येते आणि कामात दिरंगाई होता कामा नये, असा संदेश त्यांनी दिला. प्रल्हाद देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन खंडारे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक इंगळे यांनी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. त्यानुसार जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन खंडारे, जिल्हा सचिवपदी डी.एन. पांचाळ, कोषाध्यक्षपदी दिलीप नाईकवाड, जिल्हा सल्लागारपदी संजय निकाळजे, चिटणीसपदी दिपक देशमुख, संघटकपदी अशोक खरात, सहसंघटकपदी सुभाष नाहटा, प्रसिद्धी प्रमुखपदी समाधान सरकटे तसेच विधी सल्लागारपदी सागर पनाड यांची निवड करण्यात आली.

