-श्री गजानन महाराज मंदिराच्या पायाभरणी करणाऱ्या कुसुमताई वाडेकर अनंतात विलीन
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : सोयगाव आमखेडा येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या पायाभरणीत मोलाचे योगदान देणाऱ्या आणि अविरत निष्ठा व कष्टातून भक्तीचा वटवृक्ष जोपासणाऱ्या आदरणीय कुसुमताई वाडेकर यांची प्राणज्योत १५ फेब्रुवारी रोजी मालवली. त्यांच्या निधनाने सोयगाव परिसरातील गजानन भक्त परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा भक्तीचा प्रवास पुढे मोठ्या भक्त परिवारात परिवर्तित झाला. संत गजानन महाराज पालखीचे नियोजन करून त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात गावोगावी जाऊन सर्वसामान्यांना पादुकांचे दर्शन घडविले. निस्सीम भक्त म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. तेली समाजासह विविध समाजघटकांत त्यांचे असंख्य चाहते होते. ज्या गावात पालखी पोहोचली, त्या त्या ठिकाणी त्यांनी भक्तवर्ग निर्माण केला.
गजानन महाराजांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांच्या कार्यामुळे मंदिर आणि भक्तीपरंपरेला बळकटी मिळाली. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता सोयगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी बुलढाणा, खामगाव, शेगाव, जळगाव खान्देश, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धुळे आदी जिल्ह्यांतून हजारो भक्त उपस्थित होते. धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कुसुमताई वाडेकर यांच्या जाण्याने भक्तीपरिवारातील एक दीप विझला असला तरी त्यांनी जोपासलेली भक्तीची परंपरा कायम प्रेरणा देत राहील, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि वाडेकर कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच गजानन चरणी प्रार्थना.
॥ ॐ शांती ॥

