-श्री कडेपठार म्हाळसाकांत मार्तंडेश्वर ज्योतिर्लिंग संस्थानचा उपक्रम; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
देऊळगाव घुबे ता. चिखली : येथील श्री कडेपठार म्हाळसाकांत मार्तंडेश्वर ज्योतिर्लिंग संस्थान, देऊळगाव घुबे यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमासाठी विठ्ठल महाराज घुबे यांच्या पुढाकारासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. भरोसा रोडवरील खंडोबा महाराज मंदिरासमोर सकाळी हा फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या फराळाचा लाभ घेतला. धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सेवाभावी उपक्रमामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. संस्थानच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

