– प्रवीण परदेशी समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार!
– शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या लढ्याला निर्णायक यश येण्याची आशा पल्लवित!
मुंबई/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत अखेर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या ३० जूनपूर्वी राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठी कर्जमाफी जाहीर केली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे २४ ते २५ लाख शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या शेतकरी कर्जमाफीसाठी जीवावर उदार होऊन आक्रमक आंदोलने केली होती. या आंदोलनाचे फलित लवकरच शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची आशा पल्लवित झाली आहे.
नैसर्गिक संकटांचा बसला होता मोठा फटका
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील शेतीला एकामागून एक अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी भीषण दुष्काळ, तर कधी गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. त्यातच बाजारभावातील सततच्या चढउतारामुळे शेतकरी आर्थिक गर्तेत अडकला होता. बँकांचे कर्ज फेडणे अशक्य झाल्याने शेतकरी नव्या पीककर्जापासून वंचित होता. आता सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी काही अंशी कमी होण्याची चिन्हे आहेत.

