-शेवगाव पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : आखेगाव रोडवरून विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी घेऊन येणाऱ्या तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करत शेवगाव पोलीस स्टेशनने मध्यरात्री धडक कारवाई केली. या कारवाईत आरोपीसह २० लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. १२ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, आखेगाव रोडवरून एक काळ्या रंगाची विना नंबरची स्कॉर्पिओ शेवगावकडे येत असून त्यातील इसमाकडे देशी पिस्तूल आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हॉटेल रिलॅक्स इन परिसरात सापळा रचला. संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता जावेद मुनिर सय्यद (वय २७, रा. भापकर वस्ती, शेवगाव) याच्या अंगझडतीत एक गावठी बनावटीचे पिस्तूल, एक मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. संबंधिताकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत गावठी कट्टा (२०,००० रुपये), मॅगझीन (५०० रुपये), दोन जिवंत काडतुसे (१०० रुपये), सॅमसंग A24 मोबाईल (८०,००० रुपये), सॅमसंग A23 मोबाईल (२५,००० रुपये) तसेच काळ्या रंगाची विना नंबर स्कॉर्पिओ (१९,००,००० रुपये) असा एकूण २० लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकाने पार पाडली.

