सशक्त कृषी समृद्धी ग्राम योजनेअंतर्गत शेवगाव येथे सेंट्रल बँकेचा कृषी कर्ज व मार्गदर्शन मेळावा संपन्न

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-ग्रामीण विकासासाठी उद्योगाधारित कर्ज योजनांचा लाभ घ्या – निकुंज गर्ग

बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतीपूरक उद्योग उभारून सशक्त व समृद्ध भारत घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. या उपक्रमांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने कर्जपुरवठा करण्यात सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे छत्रपती संभाजीनगर विभागीय अधिकारी निकुंज गर्ग यांनी शेवगाव येथे आयोजित कृषी कर्ज व मार्गदर्शन मेळाव्यात केले.

सशक्त कृषी समृद्धी ग्राम योजनेअंतर्गत आयोजित हा मेळावा उत्साहात पार पडला. यामध्ये शेतकरी, बचत गट सदस्य, शेतकरी उद्योजक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, प्रक्रिया उद्योग तसेच उत्पन्नवाढीसाठी उपलब्ध अनुदान योजनांची सविस्तर माहिती दिली. पंचायत समिती बचत गट विभागाचे समन्वयक फिरोज सय्यद यांनी बचत गटांच्या बँक कर्ज प्रकरणांबाबत मार्गदर्शन करत कर्ज मंजुरी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय स्पष्ट केले. महिलांनी स्वयंपूर्णतेसाठी शासन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

निकुंज गर्ग यांनी सेंट्रल बँकेच्या वतीने ग्रामीण भागाच्या विकासासाठी उद्योग उभारणीसाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. शेतकरी व ग्रामीण युवकांनी उद्योगाधारित कर्ज योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रामचंद्र शिंदे, संदीप आकुर्डकर (कृषी अधिकारी, सेंट्रल बँक), गणेश फरताळे (शाखाधिकारी, बोधेगाव) यांनी बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली. महिला बचत गट व विविध उद्योगांना मंजूर कर्जाच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप राऊत (शाखाधिकारी, शेवगाव) आदी अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शारदा त्रिभुवन यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन कडू यांनी मानले.

Share This Article
Exit mobile version